Blogger Templates

Translate in Your Language

Friday, February 6, 2015

ओबामा ! आमच्या गावी पण याल ना ?

                      सगळीकडे बोंबाबोंब चालू होती, आमच्या देशात ओसामा येणार, आम्ही लई घाबरून गेलो ओ. पळता भुई थोडी झाली, लपायला जागा पण सापडेना. मग कुणीतरी एक शिकेल माणसानी आमाले सांगितलं कि आपल्या देशात ओसामा नाय तर ओबामा येणार हाय ! ओसामा तर कव्हाच मेलाय. ऐकलं तेव्हा जिवात जिव आला. पण मग म्हणलं मायला, हा माणूस असा हात हलवत येणार अन हात हलवत जाणार. त्याचं आमाले काय भो मिळणार ? न आमच्या शेतकऱ्यांचे आत्महत्या थांबणार, न मजुराला पगार मिळणार, न शेतकऱ्याला प्रत्येक पिकासाठी भाव मिळायसाठी आरडायचं थांबणार ? मग य्योबामा येणार तरी कशाला ? आशे लई प्रश्न मनात आले होते भो. पण.... अचानक ढगांचा गडगडाट झाला, विजा चमकल्या, आकाशवाणी झाली, आवाज आला ओबामांचा, ओबामा आम्हाला म्हणाले, “माय ब्रदर्स & सिस्टर ऑफ इंडिया”

            आता कोठे जिवात जिव आला, म्हटलं आपला मोठा भाऊ ओबामा आता आपल्या गावी पण येणार ! कधीतरी कुणीतरी आपल्या गावी येणार, नाहीतर election सोडलं कि आमच्या गावाकडं कुत्र पण बघत नाही. म्हटलं ओबामा आता गावाला येतील, भारतभरात कोट्यावधी लोक झोपडपट्यांमध्ये राहताय बघतील, ओबामा गावाला येतील, शेतकऱ्यांच्या हजारोंच्या संख्येने होणार्या आत्महत्या बघतील. तुमी गावाला आले असते तर कळल असतं, भारतीय माणसाच जीवन काय आहे ते. दिवसभर खचाखच भरलेल्या बसमधून, रेल्वेमधून कसातरी श्वास घेत प्रवास करणारे लाखो लोक दिसले असते. प्रत्येक रस्त्यावर दर ५०० मीटर वर अंगाला ठिगळे लावलेला, प्रचंड हलाखीत पडलेला भिकारी दिसला असता. कितीही शिक्षण झाले तरी नोकरी लागली नाही म्हणून पानटपरीवर आयुष्य घालवणारा बेरोजगार तरुण दिसला असता, ओबामा तुम्ही आले असते तर दाखवले असते सरकारी दवाखाने अन कार्यालये अन तिथल्या असुविधा.

            आज गेल्या ६५ वर्षात आम्हाला पहिल्यांदा कुणीतरी ब्रदर & सिस्टर म्हणालं, पण साहेब तुम्ही पुढं म्हणाले ‘ऑफ इंडिया (of India)’. मला पटल साहेब, एकदम. तुम्ही १००% खरं बोलले. आमचा इंडिया गेली कित्येक शतके ऑफच (OFF) आहे, तो कधी ऑन(ON) झालाच नाही. इथल्या धर्माच्या ठेकेदारांनी आम्हाला कधी ऑन होऊच दिले नाही. आम्ही हजारो वर्षे अंधश्रद्धेत पडलो होतो, असाच कुणीतरी महात्मा फुले होऊन जातो, कुणीतरी शाहू महाराज, कुणीतरी बाबासाहेब आंबेडकर होऊन जातो, आम्हाला शिक्षण मिळाव म्हणून यांनी जीवन खर्ची घातले, पण आम्हाला सध्याच्या शिक्षणातून ह्या व्यवस्थेने, ह्या राजकारण्यांनी, ह्या धर्मांध लोकांनी आम्हाला शिक्षणातून फक्त अंधश्रद्धाच दिल्या. पुन्हा कोणीतरी हि अंधश्रद्धा निर्मुलन करायला दाभोळकर जन्मावा लागतो, पण चार-दोन दिवसात त्यांचाही खून होतो. खरंच ओबामा आमचा देश ऑफच आहे. त्याला ऑन करायला कितीतरी बुद्ध झाले, महावीर झाले, चार्वाक झाले, शिवाजी, संभाजी, नानक, तुकोबा, ज्ञानोबा, नामदेव, कबीर, मीरा, चैतन्य, सम्राट अशोक, जनाई, जिजाऊ, सावित्री, अहिल्या, निऋती कित्येक कित्येक लोक आले आणि गेले. पण आमचा देश ऑफच राहिला. आजचे तरुण म्हटलं जरा शिकलेत ते तरी ऑन होतील, पण नाही, ते फक्त TV वरच्या जगाला भूललेत, hypnotise झालेत, अन मानसिक रोगी झालेत. जे TV वर दाखवलं ते त्यांनी खरं समजलं, जे TV वर दाखवलं ते त्याचं आदर्श झालं, यान्ला फक्त screen play चा psychological disease झाला. ओबामा तुम्ही बोलले त्यात मला सुधारणा करावी वाटते, तुमचं वाक्य असं हवं होत – My Brothers and sisters of ‘OFF India’. मग ते खरं झालं असतं. तुम्ही आलेत आता जरा बर वाटलं, कदाचित तुमची प्रेरणा घेऊन तरी आमची हि OFF  तरुणाई  ON  होईल आणि पेटून उठेल. पुन्हा एकदा सृजनासाठी, पुन्हा एकदा समृद्धीसाठी, पुन्हा एकदा एल्गार करेल एका नव्या स्वातंत्र्यासाठी, स्वयंप्रकाशित होण्यासाठी.

            ओबामांच्या येण्याने आमच्या देशातील तरुणींना स्फुरण आणि प्रेरणा भेटेल हे नक्कीच आहे पण प्रश्न आहे कि कोणत्या तरुणींना ? या देशाचे दोन भाग झालेले आहेत, एक India आणि दुसरा भारत, एकीकडे २५% India सर्व सुखसुविधांमध्ये जगात आहे, ऐशोआरामात जीवन व्यतीत करतो  आहे आणि ७५% समाज आपल्याच व्यथांमध्ये हलाखीत पडला आहे. हा समाज खेडोपाडी कसातरी जगतो आहे. भारतात ४०% लोक हे एकवेळ उपाशी पोटी झोपतात हे भयानक सत्य सतत लपवलं जात आहे. म्हणून प्रश्न पडतो कोणत्या तरुणी पुढे चालल्या आहेत ? २५% कि ७५% आज भारत स्वतंत्र होऊन इतके वर्ष होऊन देखील भारताच्या सामाजिक ‘ढाचा’ मध्ये ‘बुनियादी’ म्हणावा असा कोणताही बदल झालेला नाही. आजही भारतात ६०% महिलांना उघड्यावर सौचास जावे लागते, आजही भारतातील दर १० पैकी ५ मुलींचे अल्पवयातच लग्न लावले जात आहे, आज रोजसोज हुंडाबळी, domestic violence ला शारीरिक किंवा मानसिकरित्या कितीतरी महिलांना सामोरं जाव लागत आहे. अन उरल्या सुरल्या महिला देखील किती सुरक्षित आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. आज ९०% ते ९५% महिला निर्भीडपणे सांगू शकत नाही कि उद्या येणारा दिवस हा त्यांच्यासाठी सुरक्षिततेचा असेलच. उद्याच्या दिवशी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा एकही शारीरिक/मानसिक torcher किंवा अपमान होणार नाही अशा किती टक्के महिला सांगू शकतील ? आणि ह्या सगळ्याचं प्रमाण रोजसोज वाढतच चाललं आहे. कोणताही paper (वृत्तपत्र) हाती घेतला कि दुसऱ्या कोणत्या बातम्याच वाचायला भेटत नाहीये. माफ करा ओबामा भारतीय महिला प्रगती करत आहेत हे जरी वाटत असलं तरी ते प्रचंड पोकळ आणि वरवरच आहे. आतमध्ये ज्वलंत वास्तविकता वेगळीच आहे. आज रस्त्याने एकतरी तरुणी मोकळेपणाने फिरू शकते का ? सतत चारित्र्य, संस्कार, शील या प्रचंड वजनी शब्दांच्या माराखाली त्याचं जगन कठीण होऊन चालल आहे, मग भारतीय महिला, मुली, तरुणी स्वतंत्र आहे हे मी कसं म्हणावं ? खरंच या जगण्याला जीवन म्हणावं ? ज्या जिवनात अजिबातही जिवंतता नाही त्या जगण्याला जगणं तरी कसं म्हणावं ?

            हा virus भारतभर प्रचंड प्रमाणात पसरला आहे ओबामा साहेब ! म्हणून तर तुम्ही फक्त तीन दिवस भारतात आले अन तुमचं ६ तासांनी आयुष्य कमी झालं. मग इथे राहणाऱ्या लोकांच काय ? यांच्या जगण्याच काय ? ओबामा तुम्हाला एकाच विनंती करू इच्छितो, आमच्या गावाला याल त्यावेळेस येताना स्त्रियांसाठी स्वतंत्रता, स्त्रियांबद्दलचा आदर, सर्वांसाठी जीवनउपयोगी वस्तू (कमीतकमी) थोडंस आरोग्य, थोडीशी श्रीमंती, मनाची पण आणि आर्थिक पण, थोडासा आपुलकेपण, थोडीशी विश्रांती आणि थोडीशी भारतीय लोकांसाठी बुद्धीही घेऊन या. नाहीतर ह्या ऐतखाउंना काही आणण्याऐवजी तुम्ही फक्त एक विद्रोहाची ठिणगी घेऊन या, ज्यात हा समाज, तरुण व्यक्तीनव्यक्ती पेटून उठेल बंड करण्यासाठी जुना कचरा साफ करण्यासाठी आणि नवीन निर्मितीसाठी.

आणि आपण भारतीयांनी तरी जरा स्वतःची लाज वाटूद्या, आपण असल्या अवस्थेत राहत असताना देखील याबद्दल आपल्याला थोडीशीही शंका येऊ नये ? थोडीशीही चीड येऊ नये ? खरं आहे, म्हणतात ना, नाली का किडा नाली मे मजे से जीता है | आपण भारतीय सगळे नाली चे किडे झालेलो आहोत काय ? याचा विचार आता करावा लागेल. आज अमेरिकेसारख्या देशाचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा भारताकडे येतो त्यावेळेस हात हलवत, स्वागत करत प्रसन्न मनाने येतो आणि जात्या वेळेस यांची दयनीय अवस्था बघून अक्षरशः हात जोडून जातो, एव्हडच नव्हे तर भारतीय व्यवस्थेचा इतका धसका (!) घेऊन जातो कि त्याचे आयुष्य ६ तासाने कमी होते. थेट (!)

            या वेळेस चूक झाली साहेब, पण आता आम्ही थांबणार नाही, तुम्ही आमच्या चुका लक्षात आणून दिल्यात. आता आम्ही नक्कीच सुधारणा करणार एका नव्या स्वातंत्र्यासाठी, सृजनासाठी, स्वयंप्रकाशित होण्यासाठी तोपर्यंत ओबामा, मला स्वतःची लाज वाटतंच तुम्हाला म्हणावं वाटतं आहे, ओबामा ! आमच्या गावी पण याल ना ?

                                                                                                                        १/२/२०१५

-           सुयोग कल्पना बाळासाहेब नाईकवाडे

Labels